वाकळण–करवले रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य संपलं… प्रशासन ठप्प,आमदार गप्प समाजसेवक अविनाश म्हात्रे मैदानात उतरले…

0
6

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

वाकलण ते करवले (MIDC) जोडणारा महत्त्वाचा रस्ता,जो ठाणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो, गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून प्रवाशांचा व कामगार वर्गाचा रोजचा प्रवास जीवघेणा झाला होता.

ठाणे जिल्हा परिषद, कल्याण पंचायत समिती आणि वाकलण ग्रामपंचायत यांच्याकडे वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कोणी लक्ष दिले नाही. इतकेच नव्हे तर कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांना डिसेंबर महिन्यात ग्रामस्थांनी निवेदन दिले होते…मात्र आजतागायत रस्त्याचे काम झालेच नाही.यावर्षी मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने दररोज सायकल, दुचाकी, रिक्षा, कार व इतर वाहनांनी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
गणरायाचे आगमन सुखकर व्हावे व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी डोंबिवली ग्रामीण मंडळ भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. अविनाश मोरेश्वर म्हात्रे यांनी स्वतःच्या खर्चाने पुढाकार घेतला. त्यांनी जेसीबी मशीन व खडी टाकून रस्ता तयार करून दिला.

या उपक्रमामुळे स्थानिक कामगार वर्ग, ग्रामस्थ आणि प्रवासी यांनी मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले. परिसरात अविनाश म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक होत असून त्यांना खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून ओळख दिली जात आहे.
दररोज शेकडो कामगार व ग्रामस्थांच्या हालअपेष्टा लक्षात घेता एखाद्या जनप्रतिनिधीऐवजी एका तरुण समाजसेवकाने केलेले हे काम प्रशासनाला चपराक देणारे ठरले आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की अशा तरुण कार्यकर्त्यांमुळेच खऱ्या अर्थाने गाव व कामगारांना न्याय मिळतो.