उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
सिडकोमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सिडको नेरुळ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकूर (वय ५३) आणि कंत्राटी कामगार योगेश कोळी यांना ३०,००० लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.ही कारवाई नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:४० वाजता केली.तक्रारदार (वय ४५) हे एका संस्थेचे सचिव आहेत.जुईनगर सेक्टर २४ सिडको भूखंड क्र. १५ येथे गणेशोत्सवासाठी गणपती आणि देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी ३०×३० फूट मंडप उभारण्यास परवानगी घेण्यासाठी त्यांनी सिडकोकडे अर्ज दाखल केला होता.
या संदर्भात, क्षेत्रीय अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकूर आणि कंत्राटी कामगार योगेश कोळी यांनी ५०,००० लाच मागितली,मात्र ३०,००० मध्ये तडजोड झाली.तक्रारदाराने २५ ऑगस्ट २०२५ रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.ACB ने २६ ऑगस्ट २०२५ रोजी सापळा रचला.दुपारी १२:४० वाजता, सिडको नेरुळ कार्यालयात ३०,००० लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सिडकोसारख्या शासकीय संस्थांमध्ये लाचखोरीला प्रशासकीय यंत्रणा कोणतीही मुभा देणार नाही. ACB च्या कारवाईनंतर इतर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.