जरांगे पाटलांच्या प्रवेशाने महामार्ग जाम,स्टेशनांवर तुफान गर्दी… आंदोलनाच्या आगीत सामान्य जनता होरपळली…जबाबदार कोण?

0
6

मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

मुंबई देशाची आर्थिक राजधानी,लाखोंच्या रोजीरोटीचं केंद्र, मिनिटाला धावणारं हे शहर आज अक्षरशः ठप्प झालं…कारण एकच  मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत प्रवेश…जरांगे पाटलांच्या आगमनाने शहरात जणू ज्वालामुखीच फुटला.मुंबई–पुणे हायवेपासून सीएसएमटी स्टेशनपर्यंत जनसागर उसळला, रस्त्यावरून गाड्या गायब झाल्या, रुग्णवाहिका अडकल्या, रेल्वे प्रवासी त्रस्त झाले.जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी आलेल्या प्रचंड जनसागराने मुंबईचा श्वास घोटून टाकला. हायवेपासून रेल्वे स्थानकापर्यंत फक्त गर्दीच गर्दी, गोंधळच गोंधळ.         मुंबई–पुणे महामार्गावर आंदोलकांच्या लोंढ्याने अक्षरशः वाहतूक कोंडीत अडकली. गाड्या रेंगाळल्या, रुग्णवाहिका अडकल्या, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी ताटकळले. सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्यावर संकट आलं.  दादर, ठाणे आणि सीएसएमटी या महत्त्वाच्या स्थानकांवर जनसागर उसळला. ट्रेन थांबवली गेली, प्लॅटफॉर्मवर घोषणाबाजी सुरू झाली. रोजंदारीवर जगणाऱ्या कामगारांना कामावर जाता आलं नाही. रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं अवघड झालं.मुंबईची श्वासव्यूहच थांबली.पोलीस यंत्रणा कितीही अलर्टवर होती,पण जनसागरावर ताबा ठेवणं त्यांच्या आवाक्याबाहेर गेलं. अतिरिक्त बंदोबस्त उतरवूनही गर्दी आवरली गेली नाही. एकीकडे सरकारवर दबाव, तर दुसरीकडे जनतेचा प्रचंड रोष अशा विचित्र कोंडीत प्रशासन गोंधळून गेलं.जरांगे पाटलांनी ठाम शब्दांत इशारा दिला…आरक्षण मिळालं पाहिजे, नाहीतर मुंबई ठप्प होईल…या इशाऱ्याने महाराष्ट्र हादरून गेला.आंदोलकांच्या घोषणाबाजीने वातावरण तापलं. हे केवळ आंदोलन नाही, तर सरकारसमोरचं रणांगण आहे, असा संदेश या गर्दीने दिला.आता थेट प्रश्न सरकारसमोर केले आहेत … सामान्य मुंबईकरांचा जीव हा आंदोलनाच्या आगीत जळण्यासाठी आहे का? आरक्षणावर तोडगा काढण्याऐवजी सरकार का ढकलाढकली करतेय?

प्रशासन नागरिकांचे रक्षण करण्यात का अपयशी ठरतंय?आंदोलनाच्या आडून मुंबई ठप्प करणं हा लोकशाही उपाय आहे का ? प्रवाशांची, रुग्णांची, कामगारांची झालेली दाणादाण जबाब कोण घेणार? हे आंदोलन फक्त मराठा आरक्षणापुरतं मर्यादित नाही, तर लोकशक्तीचं प्रचंड सामर्थ्य दाखवणारं आहे. परंतु याच लोकशक्तीच्या आड सर्वसामान्यांचा श्वास गुदमरतोय. ज्या मुंबईला मिनिटाला धावायची सवय आहे, ती मुंबई आज ठप्प आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस पाऊल उचललं नाही, तर आंदोलनाची ज्वाला आणखी पेटेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसेल तो सामान्य नागरिकांनाच.

मुंबई ठप्प करणाऱ्या या आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर मोठं वादळ उठवलं आहे. हे लोकशक्तीचं दर्शन आहे का,कायद्याला सरळसरळ चपराक? हे ठरवणं सरकारलाच करावं लागेल. पण एवढं नक्की जरांगे पाटलांच्या एका प्रवेशाने सरकार हादरलं आहे, आणि मुंबईकरांचा संयम संपला आहे.