चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
चौक हे खालापूर तालुक्यातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र आहे. चाळीस गावांतील लोक दररोज येथे खरेदीसाठी येतात. मात्र सध्या गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्यात गावठी भाजीपाला उत्पादक आणि विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुफान पावसाने त्यांच्या मेहनतीचे सगळे गणित बिघडवून टाकले आहे.
गावठी भाजीपाला पिकवण्यासाठी शेतकरी महिला आणि पुरुष मोठ्या कष्टाने शेती करतात. पावसात आणि उन्हात उभं राहून त्यांनी पालेभाज्या तयार केल्या, ज्या गणेशोत्सवात सर्वाधिक मागणी असतात. कारण बाप्पाला नैवेद्य दाखवताना भाजी-भाकरी हमखास असते. मात्र पावसामुळे विक्रीसाठी आणलेला हा भाजीपाला ओलसर होऊन खराब होतो आणि गिऱ्हाईक त्याला हात लावत नाही.
चौक बाजारात विक्रेत्यांसाठी कोणतीही व्यवस्थित सोय नाही. हे विक्रेते उघड्यावरच बसतात. पावसात भाज्या भिजल्याने त्यांचा टिकाव लागत नाही. “इतक्या कष्टाने भाजी आणली, पण विक्रीच्या ठिकाणीच पावसाने ती वाया जाते. गणपती आला तरी आमच्या घरी उत्सव नाही, फक्त चिंता आहे,” असे एका महिला विक्रेत्या डोळ्यात पाणी आणून सांगितले.
श्रावण संपून गणेशोत्सव सुरू झाला आहे. गावोगावी पूजा, आरती, प्रसादाचा सोहळा सुरू आहे. पण या मेहनती विक्रेत्यांच्या संसारात मात्र सणाऐवजी संघर्षच आहे. हातावर पोट असणाऱ्या या लोकांसाठी एका दिवसाची विक्री म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो. पावसामुळे भाजी खराब झाली की थेट त्यांच्या जगण्यावर संकट येते.
या परिस्थितीत ग्रामपंचायतीकडे विक्रेत्यांची मागणी आहे की, “आम्हाला किमान पावसापासून वाचण्यासाठी शेड किंवा पर्यायी जागा द्या.” मात्र अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. सरकार आणि ग्रामपंचायतीने जर थोडं पुढाकार घेतला तर या कष्टकऱ्यांच्या घरीही उत्सव साजरा होऊ शकेल. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभमुहूर्तावर प्रशासनाने यांची दखल घेऊन उपाययोजना केली तरच त्यांच्या डोळ्यातील चिंता नाहीशी होऊन आनंदाचा दिवा पेटेल.