मराठा आरक्षणासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव :हर्षवर्धन सपकाळ

0
5

मुंबई/रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा फक्त आजचा नाही तर अनेक वर्षांपासूनचा आहे. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडेच नाही. सत्ता मिळाल्यावर ‘सात दिवसात मराठा आरक्षण देऊ’ अशी घोषणा करणाऱ्या फडणवीस जींच्या शब्दाचे काय झाले?” असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केला.

मुंबईतील टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ, काँग्रेसचे खासदार श्री. शाहू महाराज छत्रपती (कोल्हापूर) व खा. डॉ. कल्याण काळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी सपकाळ म्हणाले, “मराठा समाजाने मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वी केली होती. तरीदेखील सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. आता मात्र आंदोलकांना अडवले जात आहे. आधी परवानगी नाकारली व शेवटी केवळ एका दिवसासाठी दिली. त्यामुळे वाहतूक कोंडी व गोंधळ झाल्याचे सांगून मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रत्यक्षात यासाठी जबाबदार भाजपा सरकारच आहे.”

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले, “मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी नवी मुंबईत मराठा आंदोलकांच्या पायाशी पडून आरक्षणाचा शब्द दिला होता. जीआर काढण्याचे आश्वासन देऊन गुलाल उधळला गेला, आंदोलक विजयी भावनेने परत गेले. मात्र आजही तो शब्द पाळला गेला नाही. जर मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नसतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे.”

ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार दिल्लीत नेहमी जातात. मग मराठा समाजाच्या आरक्षणासाठीही त्यांनी तेथे जाऊन ५० टक्क्यांची मर्यादा दूर करावी. तसेच जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांनी या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकमध्ये जातनिहाय जनगणना झाली आहे. महाराष्ट्रालाही ती तातडीने करावी. राज्य सरकारला मार्गदर्शन हवे असल्यास आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री यांना बोलावून ही प्रक्रिया कशी करावी याची माहिती देऊ.”

सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “काँग्रेस आघाडी सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण ते फडणवीस सरकार टिकवू शकले नाही. आरक्षण हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षाचा याला कालही पाठिंबा होता आणि आजही आहे. मात्र सत्ता हाती असताना निर्णय घेण्याची जबाबदारी भाजपा युतीची आहे. जर ते शक्य नसले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करून पायउतार व्हावे. आम्ही हा प्रश्न नक्की सोडवू.”