रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
देशाच्या राजकारणात आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक रंगतदार ठरणार असून इंडिया आघाडीने न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे. काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे दि. 29 ऑगस्ट, 2025 रोजी रेड्डी यांनी खासदारांची भेट घेत समर्थन मागितले.
पत्रकार परिषदेत रेड्डी म्हणाले, “इंडिया आघाडीने माझी उमेदवारी निश्चित केली आहे. सर्व पक्षांच्या खासदारांना मी वैयक्तिक पत्र पाठवून पाठिंबा मागणार आहे. भाजप खासदारांनी वेळ दिल्यास त्यांचीही भेट घेईन. या निवडणुकीत गुप्त मतदान होत असल्याने माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तर मला मतदान करण्याची विनंती मी सर्वांना करतो.”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “देश संकटात असताना लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. या निवडणुकीत निकाल चमत्कारिक ठरू शकतो.” मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, “इंडिया आघाडीकडे बहुमत नसले तरी रेड्डी विजयी ठरू शकतात.”
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, सर्वपक्षीय संवाद साधणारे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आणि इंडिया आघाडी यांच्यामुळे उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.