माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
तालुक्यातील शेरख येथील ७० वर्षीय संगीता मनोहर मोकल यांच्या जबरी चोरीसह खून प्रकरणातील आरोपीला माणगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शिताफीने अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भा.न्या.संहिता 2023 चे कलम 103(1), 311, 333 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक १० मे २०२५ रोजी आरोपीने फिर्यादी यांच्या घरात घुसून वृद्ध महिलेस गळा दाबून ठार मारले व सोन्याचे दागिने व दोन मोबाईल चोरी करून पसार झाला होता.गुन्ह्यातील आरोपी कल्पेश बबन जाधव (वय २२ वर्षे, रा. शेरख आदिवासीवाडी, ता. माणगाव) यास पोलिसांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री अटक केली. ३० ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास पोलिस कोठडी देण्यात आली. आरोपीकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे (महाड) व पुष्कराज सूर्यवंशी (माणगाव) यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाणे निरीक्षक निवृत्ती बो-हाडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.रायगड पोलिस दलाने दाखवलेली ही तत्परता व शिताफी नागरिकांसाठी विश्वासार्ह ठरत असून, गुन्हेगारांना कडक धडा शिकविणारी ठरली आहे.