पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे.भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी राजेंद्र पाटील यांनी व्यासपीठावरून थेट दात घशात घालायची धमकी दिल्यानंतर वातावरण पेटलं आहे…भाजपमध्ये यावरून संताप आहे,पण याच घटनेने एक प्रश्न सरळ डोळ्यासमोर उभा राहतो…रायगडमध्ये भाजपचं वजन खरंच कमी होत चाललं आहे का?
पनवेलमधील शेकापच्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात, शेकापच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, राजेंद्र पाटील यांनी थेट गणेश कडू यांचा नामोल्लेख करून म्हटलं परत जर दात दाखवलेस तर तुला तिथेच फटकावेल,तुला सोडणार नाही…हा संवाद काही साधा नव्हता;हा स्पष्ट इशारा होता.कडू यांनी तत्काळ पनवेल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
गणेश कडू यांनी दोन महिन्यांपूर्वी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शेकाप गटात काहींचा राग त्यांच्या मागे लागला होता…पण प्रश्न एवढाच आहे की, जर भाजप रायगड जिल्ह्यात खरोखर मजबूत असता,तर शेकापचा एक पदाधिकारी सार्वजनिक मंचावर उभं राहून जिल्हा उपाध्यक्षाला अशी धमकी द्यायची हिंमत दाखवली असती का?
राजकीय जाणकारांच्या मते, शेकापचं अजूनही ग्रामीण रायगडवर पकड आहे.भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक नेते, यांचे प्रयत्न सुरू असले तरी पनवेल-उरण भागात शेकापची दादागिरी अजूनही दिसून येते.भाजपचा उपाध्यक्ष उघडपणे धमकीचा बळी ठरतोय आणि भाजप पोलिसात तक्रारी दाखल करत फिरतोय, हीच वस्तुस्थिती भाजपच्या कमकुवत होत चाललेल्या राजकीय स्थितीची जाणीव करून देते.
भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला आहे…कारवाई झाली नाही तर नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल.पण खरी कसोटी आता भाजपची आहे.फक्त निवेदनं देऊन थांबणार की खरंच शेकापच्या या दादागिरीला मैदानावर उतरून उत्तर देणार? रायगडमधलं भविष्यातलं राजकीय समीकरण यावरच ठरणार आहे.