उरण शिवसत्ता टाईम्स (प्रवीण पाटील):-
उरण तालुक्यातील खोपटे गावातील मेसर्स कॉन्टिनेंटल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (न्हावा शेवा) प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला सध्या मेसर्स डी.पी. वर्ल्ड मल्टीमोडल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखले जाते, यांचा कस्टम परवाना निलंबित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसच्या कमिशनर बी. सुमिदा देवी यांनी यासंदर्भात अधिकृत सार्वजनिक नोटीस जारी केली असून, या घटनेने संपूर्ण लॉजिस्टिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कस्टम विभागाने २००९ च्या नियम ११(२) च्या तरतुदीनुसार ही कारवाई केल्याचे नोटीशीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जोपर्यंत कस्टम विभागाचे पुढील आदेश येत नाहीत, तोपर्यंत डी.पी. वर्ल्डचे कॉन्टिनेंटल गोदाम कोणतेही आयात-निर्यात व्यवहार करू शकणार नाही. जर असे व्यवहार केले गेले, तर ते थेट कस्टम कायद्याचा भंग मानला जाईल आणि संबंधित गोदाम मालक व व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
खोपटे परिसरातील गोदामे ही उरण तालुक्यातील व्यापारी व्यवहारांचे महत्वाचे केंद्र मानली जातात. त्यामुळे या कारवाईनंतर इथल्या इतर गोदाम मालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. कस्टम विभागाकडून निलंबनाचा निर्णय घेतला गेल्याने लॉजिस्टिक व्यवसायावर तात्पुरता परिणाम होणार असून, अनेक कंपन्यांच्या आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. याचा थेट परिणाम उद्योग-व्यवसायावर होऊन आर्थिक उलाढालीवर परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे कस्टम विभाग किती गंभीरतेने नियमांचे पालन करवून घेत आहे, हे स्पष्ट झाले आहे. नियमबाह्य कामकाज करणाऱ्यांना कसलाही पाठींबा मिळणार नाही, असा संदेश कस्टमने या कारवाईतून दिला आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात आणखी चौकशी व निर्णय अपेक्षित आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील इतर गोदाम मालक व कंपन्यांनी देखील या घटनेतून धडा घेऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.