रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
कर्जत पोलीस ठाण्यात एका मारहाणीच्या, गाडीचे नुकसान केल्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी असंज्ञेय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एनसीआर क्र. 0744/2025 अशी ही नोंद दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली असून, संबंधित घटना 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली आहे.
तक्रारदार अनंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ते आपल्या टाटा सफारी (MH-46/CR-9891) गाडीतून कर्जत येथे गेले होते. सायंकाळी साधारण 5.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आणि आरोपी पंकज रामदास मसणे याने आपल्या साथीदारांसह तक्रारदाराच्या गाडीच्या मागील दरवाजाची काच लाकडी दांडक्याने फोडली. त्यावेळी आरोपींनी तक्रारदारास शिवीगाळ केली तसेच “जीव घेऊ” अशी उघड धमकी दिली.
यानंतर तक्रारदार घरी जात असताना दहिवली येथे ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवली असता, आरोपी पुन्हा गाडीसमोर आले. साधारण 6.30 वाजता त्यांनी तक्रारदाराच्या गाडीच्या मागील बाजूस पुन्हा प्रहार केला. या घटनेदरम्यान तक्रारदारास शिवीगाळ करण्यात आली आणि दमदाटी करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी आरोपी पंकज मसणे याच्यासह तीन अनोळखी साथीदारांचा समावेश असून त्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या मारहाणीच्या घटनेत फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.या घटनेचे साक्षीदार म्हणून संगिता पाटील, समीर पाडेकर, सायली पाडेकर,धनवंता खताळ, अरुण पाटील आणि पार्थ पाटील यांची नावे नोंदवण्यात आली आहेत.
कर्जत पोलीस ठाण्यात हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 324(4), 351(2), 352 व 3(5) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा असंज्ञेय स्वरूपाचा असल्याने पोलीसांनी प्राथमिक चौकशी करून तक्रारदारास न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.या घटनेमुळे कर्जत परिसरात खळबळ उडाली असून, दहशत माजवणाऱ्या आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे.