चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-
कोयना जांब्रुक वावंढळ परिसरात गेल्या सात दिवसांपासून उत्साहात सुरू असलेला गणेशोत्सव आज भावपूर्ण वातावरणात विसर्जनाने संपन्न झाला. ६७ वर्षांच्या परंपरेला अनुसरून गावातील ग्रामदैवतांना मानकरी मंडळींनी मंदिरात पुन्हा स्थानापन्न केल्यानंतर घराघरांत आरत्या झाल्या आणि वाजतगाजत सर्व गणेश-गौरींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला… अशा आर्त घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला. गावाच्या सीमेवर असलेल्या नदीकाठी गणरायांना निरोप देण्यात आला. निरोपाच्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते…गावकरी, भाविक आणि लहानथोर मंडळींनी एकत्र येऊन पारंपरिक उत्साहात हा विसर्जन सोहळा साजरा केला.