पारंपरिक वाद्य वाजवून गणरायाला निरोप द्यावा:पोलीस निरीक्षक सचिन पवार

0
13

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

अनंत चतुर्दशी दिवशी पारंपरिक वाद्य वाजवून गणरायाला निरोप द्यावा असे आवाहन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे.अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती यांना निरोप देण्यात येणार आहे,यावेळी डॉल्बी, डीजे या वेस्टर्न वाद्य याचा वापर न करता पारंपरिक महाराष्ट्रीयन वाद्य वाजवून गणरायाला निरोप देण्यात यावा, असे आवाहन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे.विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट, डीजे, डॉल्बीवर बंदी चे आदेश रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी नुकतेच दिले आहेत, त्याचे तंतोतंत पालन सर्वांनी करावे असेही त्यांनी म्हटले आहे.

डीजे,डॉल्बीच लेझर लाईट वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुसार आता गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.लाडक्या गणरायाचे स्वागत करताना मोठ्या मंडळांकडून स्वागत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.यात डीजेचा वापर करण्यात आला होता. मात्र यामुळे होणारा त्रास लक्षात घेता राज्यात अनेक ठिकाणी या उत्सवाच्या काळात डीजे वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी लेझर लाईटचा वापर देखील करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आता गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील याचा वापर होण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्हाधिकारी यांनी बंदीचे आदेश काढले आहेत.डॉल्बी, लेझर आणि एलईडी डॉल्बी आणि डीजे सिस्टीमचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक आहे,खासकरून मोठा आवाज आणि ध्वनी प्रदूषण यामुळे याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. उच्च आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते, ज्यामुळे लोकांना चिडचिड, तणाव आणि झोप न येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. उच्च आवाजामुळे कानाचे पडदे फाटणे, बहिरेपणा येणे किंवा इतर श्रवणशक्तीचे विकार होऊ शकतात. सततच्या मोठ्या आवाजामुळे मानसिक ताण, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या उद्भवू शकतात.

गर्भवती महिला आणि बालकांवर मोठ्या आवाजामुळे गर्भवती महिला आणि लहान बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कधीकधी गर्भपात किंवा अकाली प्रसूती देखील होऊ शकते, उच्च आवाजामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

याव्यतिरिक्त,अनेक ठिकाणी डीजे आणि डॉल्बी सिस्टीमचा वापर सार्वजनिक शांतता भंग करतो, त्यामुळे लोकांना त्रास होतो.अनेक ठिकाणी डीजे आणि डॉल्बी सिस्टीमच्या वापरासाठी नियम आणि निर्बंध लागू केले जातात.महाराष्ट्रामध्ये अनेक पारंपरिक वाद्ये आहेत,जी विविध लोककला आणि संगीतामध्ये वापरली जातात.त्यापैकी तुतारी,टाळ,ढोलकी,ढोल,ताशा आणि चिपळ्या यांचा वापर केल्यास लोप पावत चाललेली वाद्य यांना पुनर्जीवन मिळेल,नवीन पुढील आपली वाद्य यांची माहिती उपलब्ध होईल. काही प्रमुख वाद्ये आहेत, जी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि संगीतामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले.