समाजप्रबोधनाचा अखंड दीप ह. भ. प. बापूसाहेब ढगे महाराज युवक आधार समाजरत्न पुरस्कार जाहीर…

0
4

पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

समाजजागृती,व्यसनमुक्ती आणि भक्तीमार्ग प्रसारासाठी आयुष्य अर्पण करणारे आष्टी तालुक्यातील पारोडी येथील ह.भ.प.बापूसाहेब ढगे महाराज यांना यंदाचा दैनिक युवक आधार समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होत असून पारोडी व बोरुडी सह संपूर्ण आष्टी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ह.भ.प.बापूसाहेब ढगे महाराज हे आनंद संप्रदायाचे तेजस्वी प्रवर्तक असून, परम पूजनीय बंडू बाबा महाराज यांच्या प्रेरणेने व परम पूजनीय नाना महाराज वाघमारे यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी वयाच्या २५व्या वर्षी आनंद संप्रदायाचा अनुग्रह स्वीकारला. त्या क्षणापासून त्यांनी भक्तिमार्ग, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्त समाजनिर्मिती यासाठी आपले जीवन समर्पित केले.

महाराजांनी कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून शेकडो गावे पालथी घातली आहेत.त्यांच्या प्रबोधनपर कीर्तनांमुळे असंख्य तरुण व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडून भक्तिमार्गाकडे वळले.समाजातील दुरावलेले घटक एकत्र आणणे, शांतता, सद्भावना आणि अध्यात्माची शिकवण देणे हे त्यांचे ध्येय ठरले आहे.

त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बोरुडी येथे उभारलेले परम पूजनीय बंडू बाबा महाराजांचे मंदिर,जे आज हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.तसेच पारोडी येथे ते गेली सलग बारा वर्षे आनंद संप्रदायाचा वैष्णव मेळावा आयोजित करीत आहेत.या मेळाव्यामुळे आष्टी तालुक्यात अध्यात्मिक व सामाजिक वातावरण अधिक बहरत आहे.

त्यांच्या या सातत्यपूर्ण समाजकार्यासाठी आणि प्रबोधनात्मक योगदानासाठी दैनिक युवक आधार समाजरत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ७ सप्टेंबर रोजी न्यू पनवेल, सेक्टर ७  शबरी हॉल येथे आयोजित कार्यक्रमात आयबीएन 18 लोकमतचे सहसंपादक मा. श्री. विलास बडे आणि स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका हळद रुसली, कुंकू हसलं फेम अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संपादक संतोष आमले यांनी दिली आहे.

या पुरस्कारामुळे आनंद संप्रदायातील सर्व भाविकांमध्ये आणि आष्टी तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून,बापूसाहेब ढगे महाराज यांच्या कार्याचा गौरव होणे ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी बाब ठरली आहे.