गडहिंग्लज शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
मराठा समाजाच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा सुवर्ण क्षण अखेर उजाडला आहे…आरक्षणासाठीच्या अखंड लढ्याचा ऐतिहासिक विजय अखेर महाराष्ट्र सरकारकडून मान्यतेच्या शिक्क्याने गवसला…मुंबईतील उपोषणाच्या रणांगणावर पाच दिवस सातत्याने धैर्याने लढणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जिद्दीसमोर शासनाने झुकावे लागले. या निर्णायक यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आनंदाचा जल्लोष उसळला असून गडहिंग्लज शहरही या अभिमानाच्या पर्वात सामील झाले…
गडहिंग्लज सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवार,दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले.योगायोग असा की, हाच आनंदोत्सवाचा क्षण बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी आमचे प्रतिनिधी रायगडहून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गडहिंग्लज शहरात एकदिवसीय भेटीवर आले असताना अनुभवण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादनाने झाली.त्यानंतर चौकात “एक मराठा लाख मराठा”,छत्रपती शिवाजी महाराज की जय”,जरांगे साहेबांचा विजय असो”,हर हर महादेव” या घोषणांच्या गजराने आसमंत दणाणून गेला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, मिठाईचे वाटप आणि जनसामान्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण चौक आनंदाने उजळून निघाला. वाहनधारक असोत की पादचारी – सर्वांना लाडू देऊन या विजय सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले. पाहता पाहता गडहिंग्लज चौक हा आनंदाचा महासागर बनून गेला.
या विजयोत्सवात किरण कदम (अध्यक्ष, सकल मराठा समाज), नागेश चौगुले (जिल्हाध्यक्ष, मनसे), आप्पासो शिवणे, युवराज बरगे, तानाजी कुराडे, शिवाजी कुराडे, एल. डी. पोवार साहेब, सरदेसाई सर, जगदीश पाटील, उत्तम देसाई, नाथा रेगडे, प्रा. शिवाजीराव भुकेले, अमरसिंह चव्हाण व ॲड. दिग्विजय कुराडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे या विजयाचा गोडवा पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित पत्रकार बांधवांनाही अनुभवता यावा, यासाठी मिठाईचे वाटप उत्तम देसाई व अन्य कार्यकर्त्यांनी विशेषतः केले.याच प्रसंगी नगराध्यक्षा सौ. मंजुषा कदम यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी शुभेच्छा देऊन उत्सवाचे सोनेरी पर्व अधिक संस्मरणीय केले.
या जल्लोषमय सभेने मराठा समाजाची एकजूट,संघर्षशीलता आणि हक्कासाठीची अविचल निष्ठा अधोरेखित केली.गडहिंग्लज शहर विजयाच्या या सोहळ्याने भारावून गेले.मराठा समाजाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अथक संघर्षामुळे गवसलेल्या या यशाने गडहिंग्लजमध्ये अभिमान, समाधान आणि नवचैतन्याचा अविस्मरणीय क्षण घडवून आणला.