बिरवाडी बाजारपेठेत एका 42 वर्षीय व्यावसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

0
4

महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-

महाड तालुक्यातील बिरवाडी शहर बाजारपेठेतील एका 42 वर्षीय व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतोष तानाजी जाधव असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून तो मूळ खरवली, बिरवाडी येथील रहिवासी होता. मयत संतोष जाधव याचं बिरवाडी बाजारपेठेत विक्रम स्टॅन्ड शेजारी भांड्याचे दुकान होते. श्री कृपा भांडी दुकान असे या दुकानाचे नाव असून संतोष याने गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्ती विक्रीचा व्यवसाय देखील याच दुकानांमध्ये केला होता. दिनांक 5 सप्टेंबर रोजी संतोष याने स्वतःच्या मालकीचे असलेल्या दुकानातील सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सर्व धंदा पाणी सुरळीत चालू असताना संतोष याने अचानक आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून सदरचा मृत्यू देह शवविच्छेदनाकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे पाठविण्यात आला आहे. संतोष याने अचानक आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याने समाजामध्ये व विभागामध्ये शोककळा पसरली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष नटे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.