माणगावात आंदोलनकर्त्यांचा शासनाला ठाम संदेश जन सुरक्षा कायदा मागे घ्या…

0
5

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

केंद्र सरकारच्या प्रस्तावित “जन सुरक्षा कायदा” विरोधात माणगाव तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे भव्य आणि शिस्तबद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. लोकशाही मार्गाने शासनाविरोधात आवाज उठवण्याची ही गरज असल्याने विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि लोकशाहीच्या शक्तीचे प्रदर्शन घडवून आणले.

सकाळी सुमारे ११:३० वाजता मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव एस.टी. स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा मुख्य बाजारपेठ, कचेरी रोड, विकास कॉलनी रोड मार्गे तहसीलदार कार्यालय येथे पोहोचला व शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी “जन सुरक्षा कायदा मागे घ्या” अशा आशयाची घोषवाक्ये देत निषेध नोंदविला. संपूर्ण मोर्चा शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.

या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे माणगाव तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विलास सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या प्रसंगी नंदू शिर्के (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष रायगड जिल्हा प्रमुख), माणगाव ता. काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, उबाठा उपतालुका प्रमुख नाडकर, संपर्क प्रमुख सोनवणे, माणगाव काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष निसार फिरफिरे, इंदापूर विभाग काँग्रेस अध्यक्ष महेश जाधव, आदिवासी संघटक, माणगाव काँग्रेस मारुती पवार, रायगड जिल्हा बिष्णोई समाज अध्यक्ष भवरलाल, कार्यकर्त्या गौरी जाधव, ईतर जसे सुबोध गंभीर, हिरामन वाघमारे, कैलास वाघमारे, संदीप नागे, नामदेव शिंदे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनातून हे स्पष्ट झाले की केंद्र सरकारच्या जन सुरक्षा कायद्याबाबत जनतेत तीव्र नाराजी आहे. लोकप्रतिनिधी, पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक एकवटले तर लोकशाहीच्या मार्गाने शासनापर्यंत ठोस संदेश पोहोचू शकतो, हे या मोर्च्याने अधोरेखित केले. लोकशाहीतील सामूहिक शक्तीचे दर्शन घडवत हा मोर्चा माणगाव तालुक्याच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना ठरली.