5 वर्षांची नि:शब्द सेवा,आदिवासी शिक्षणाचे खरे आधारस्तंभ सरपंच विरले दांपत्य… तब्बल पाच वर्षे आदिवासी मुलांची फी भरूनही न केली प्रसिद्धी…

0
2

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-  

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून शैक्षणिक फी स्वतःच्या खर्चाने भरून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारे सरपंच महेश विरले आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्नाताई महेश विरले हे आता ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत.

कोल्हारे आदिवासी वाड्यातील अनेक पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण थांबू नये या भावनेतून विरले दाम्पत्याने कोणताही गाजावाजा न करता हा उपक्रम सुरू ठेवला.फी व्यतिरिक्त या कृतीमुळे आदिवासी मुलांचे शिक्षण खंडित न होता त्यांची स्वप्ने जिवंत राहिली.स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की,पाच वर्षे कुणालाही न कळू देता त्यांनी ही मदत केली.आता जेव्हा हे समोर आले तेव्हा संपूर्ण गावाला अभिमान वाटला.समाजात असे कार्य करणाऱ्या लोकांमुळे खऱ्या अर्थाने परिवर्तन शक्य आहे.

स्वतः ज्योत्स्नाताई विरले यांनी नम्रतेने प्रतिक्रिया देताना सांगितले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे व “हे आमचं कर्तव्यच आहे. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजासाठी काहीतरी परत करणं हेच आमचं समाधान आहे.ज्योत्स्नाताई यांनीही या मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे,असे सांगितले.हा निःस्वार्थी उपक्रम केवळ कोल्हारे गावासाठीच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.