पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी म्हणून ओळख आहे. याच रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश आहे. जसा रायगडच्या गडकिल्ल्यांचा इतिहास नागरिकांना ठाऊक आहे, तसेच पनवेलमधल्या वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या खड्ड्यांचादेखील इतिहास माहिती व्हावा, त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी मनसेकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.. खड्डे तुमच्या दारात, पैसे कंत्राटदाराच्या घरात’, यावंच लागतंय, खड्ड्यात पडावंच लागतंय’ अशा प्रकारचे फलक झळकावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी (दि. 10) पनवेल शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले.पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. नागरिकांना होत असलेल्या या त्रासाची दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत ‘खड्डे सफारी’चे आयोजन करण्यात आले. आंदोलनात यमराजाच्या वेशात सामील झालेल्या कार्यकर्त्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मनसे प्रवक्ते योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रवाशांनी भरलेली बस घेऊन पनवेल एसटी स्टॅन्ड, पनवेल शहर तसेच पालिका कार्यालयासमोरील रस्त्यावरील खड्ड्यांची सहल प्रवाशांना घडवण्यात आली. पनवेल पालिकेच्या माध्यमातून पालिका हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामदेखील करण्यात येत आहे. मात्र, नुकत्याच सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले असून, खड्ड्यांतून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना खड्ड्यांची सहल घडवत अनोखे आंदोलन केले आहे. मनसेचने केलेल्या या अनोख्या आंदोलनाची पनवेल परिसरात मोठी चर्चा सुरू असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.