माणगावात हंगामातील पहिला धुक्याचा अनुभव; हिवाळ्याची चाहूल, पण पावसाचे आणि उकाड्याचे सावट कायम…

0
2

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

बुधवार, १० सप्टेंबर रोजी हंगामातील पहिल्या धुक्याने सकाळची सुरुवात झाली. यामुळे माणगावकरांना हिवाळ्याची चाहूल लागली. सकाळी अचानक पसरलेल्या धुक्याने पावसाळ्याच्या अखेरीसह थंड दिवसांची सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले. परंपरेने भारतात मान्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर असा चार महिन्यांचा असतो. मात्र, गेल्या दोन-तीन दशकांत हवामानातील अनिश्चिततेमुळे मान्सून ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत खेचला जात असल्याचे दिसून येत आहे. याच काळात धुक्याची चाहूल अधिक प्रमाणात जाणवते.

दरम्यान, हवामान खात्याने जाहीर केले आहे की यंदा मान्सूनची परतीची प्रवास ऑक्टोबरच्या मध्यापासून होईल. सप्टेंबर महिन्यात अजूनही जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे धुके व पावसाचे अंदाज या दोन्हींच्या मिश्रणामुळे यंदा ऑक्टोबरची उकाड्याची झळ जाणवणार का, की हिवाळा लवकरच येणार याबाबत उत्सुकता आहे.

बुधवारी सकाळी माणगावात दाट धुक्याचा अनुभव आला. बहुतांश परिसर पांढऱ्या चादरीत लपल्यासारखा दिसत होता. एका गृहिणीने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, “मी सकाळी गॅलरीची खिडकी उघडली तेव्हा समोर दाट धुक्याची चादर दिसली. मी राहते त्या दुसऱ्या मजल्यावरून सगळीकडे फक्त धुकंच दिसत होतं.”

मात्र सकाळच्या या गारव्याला दुपारी आणि संध्याकाळी तीव्र उकाड्याची जोड मिळाली. एका किराणा दुकानदाराने सांगितले, “आजचं हवामान फारच अस्वस्थ करणारं होतं. सकाळी थंडगार धुकं होतं, पण दिवस जसजसा पुढे गेला तसतसा उकाडा प्रचंड वाढला.”

या विरोधाभासी हवामानामुळे माणगावकरांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकीकडे धुक्यामुळे हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल लागल्याने आनंद आहे, तर दुसरीकडे उकाड्यामुळे ऑक्टोबरची झळ यंदाही जाणवणार का अशी चिंता व्यक्त होत आहे.