माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
मागील दोन-तीन दिवसांपासून माणगाव नगर पंचायत तर्फे घराघरांपर्यंत स्वच्छ आणि ताज्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. बराच काळानंतर नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी बर्याच वेळा नगर पं.कडून मिळणारे पाणी मळकट, चिखलमिश्रित किंवा अस्वच्छ स्वरूपाचे येत होते. यामागे फिल्टरेशन प्रणालीतील बिघाड, वीजपुरवठा खंडित होणे, अतिवृष्टीमुळे गाळ येणे, फिल्टरेशन टाकी स्वच्छ करण्याची प्रक्रिया, पाईपलाईन गळती आदी कारणे असू शकतात, अशी नागरिकांची भावना होती. १८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे नऊ वाजता आमच्या प्रतिनिधींनी वॉर्ड क्रमांक १२ मधील एका कुटुंबाला भेट दिली असता अत्यंत अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्यांनी काही छायाचित्रे व थेट व्हिडिओ काढून अस्वच्छ पाण्याची स्थिती नोंदवली. आमचे प्रतिनिधी स्वतः वॉर्ड क्रमांक १६ मधील असून तेथे इतकी बिकट परिस्थिती दिसली नसल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर समाजसेवक अरिफभाई करबेलकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माणगावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा नेहमीच विस्कळीत दिसून येतो. कुठल्या वॉर्डमध्ये घाणेरडे पाणी येते, कुठल्या वॉर्डमध्ये पुरवठ्यात कपात होते, कुठे वेळेचे बेताचे नियोजन नसते, तर काही ठिकाणी अगदी अयोग्य वेळेस पाणी सोडले जाते. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये सध्या सुरु असलेला स्वच्छ पाण्याचा पुरवठा स्वागतार्ह असला तरी सर्व वॉर्डमध्ये समान आणि नियमितपणे हा पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा आहे. दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून गेल्या काही दिवसांपासून मिळणाऱ्या स्वच्छ पाण्याबद्दल अभिनंदन केले व याआधी पुरवठा झालेल्या अस्वच्छ पाण्याचे फोटो-व्हिडिओही दाखवले. त्यावर विभागाकडून “आपले मुद्दे नोंदवले आहेत, मात्र मी सध्या प्रांत कार्यालयातील बैठकीत आहे” असा संदेश पिण्याच्या पाणी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कळविले. एकंदरीत, वॉर्ड क्रमांक १६ मध्ये सुरु झालेल्या स्वच्छ पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, नगर पंचायतने अशीच सातत्यपूर्ण सेवा सर्व वॉर्डमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.