खालापूर शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल तालुक्यातील मौजे कुंभिवली (सर्वे नं. ५४/२, क्षेत्र ०.५८.६० हे.आर.) येथील आदिवासी जमीन अखेर १२ वर्षांच्या लढाईनंतर मूळ मालकांच्या नावावर परत आली आहे.राघो नारायण वीर यांच्या नावावर सातबारा व प्रत्यक्ष ताब्यात असलेली ही जमीन सन २०१२ मध्ये तत्कालीन तलाठी सुनील बांगर (सध्या विश्वनिकेतन कॉलेजचे विश्वस्त)यांनी तत्कालीन पोलिस पाटील हरी दामोदर वीर यांच्यासोबत संगनमत करून बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्याचा आरोप होता.
जमीन परत मिळवण्यासाठी आदिवासी कुटुंब तब्बल १२ वर्ष न्यायासाठी झगडत होते. योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांची केस रखडली होती.अखेर उरण सामाजिक संस्था व अॅड. राजेंद्र मढवी यांच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी न्यायालयात लढा सुरू झाला.न्यायालयाने जमीन आदिवासी कुटुंबाच्या बाजूने दिली;मात्र विश्वनिकेतन कॉलेजने हरी दामोदर वीर याला पुढे करून महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण,मुंबई येथे अपील दाखल करून स्थगिती आदेश मिळवला होता.या प्रकरणात खालापूर पोलिस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा यासाठी मागील एक वर्ष पाठपुरावा सुरू होता.तत्कालीन रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तरीही कारवाई होत नव्हती.काही दिवसांपूर्वीच उप विभागीय पोलिस अधीक्षक (एसडीपीओ) खालापूर डॉ. विशाल नेहूल यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले. कायद्याचा खोलवर अभ्यास आणि अशाच प्रकरणाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी सर्व संबंधितांना पोलिस स्टेशनला बोलावून समज दिली.त्यांच्या हस्तक्षेपानंतर विश्वनिकेतन कॉलेज प्रशासनाने आदिवासी कुटुंबाशी चर्चा करून तडजोड मान्य केली आणि महसूल न्यायाधिकरणातील अपील मागे घेतले. परिणामी राघो नारायण वीर यांची जमीन १०० टक्के परत मिळाली.या ऐतिहासिक विजयासाठी कुटुंबातील श्रीमती द्वारका लहू वारगुडे यांनी डॉ. विशाल नेहूल, अॅड. राजेंद्र मढवी, उरण सामाजिक संस्था, पोलिस निरीक्षक सचिन पवार आणि पोलिस उपनिरीक्षक संतोष अवटी यांचे विशेष आभार मानले आहेत.या प्रकरणात डॉ. विशाल नेहूल यांची कर्तव्यदक्षता आणि ठाम भूमिका हा आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा निर्णायक टप्पा ठरला आहे.