तळोजा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
फेज-२ परिसरात भर दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.नात्यातील व्यक्तीनेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून चाकूने सपासप वार करत तिचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे… पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय मोहम्मद आयुब साहिल याने दुपारच्या सुमारास आपल्या नात्यातील या मुलीच्या घरात प्रवेश करून तिला चाकूने वार केले.गंभीर जखमी झाल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिन्ही विशेष पथकं तयार केली.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.तांत्रिक पुरावे व स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी मोहम्मद आयुब साहिल याला ताब्यात घेतलं.चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली…प्राथमिक तपासात मृत मुलगी व आरोपी यांच्यात आर्थिक देवाणघेवाण तसेच काही वैयक्तिक कारणांवरून वाद असल्याचं निष्पन्न झालं आहे. या वादातूनच त्याने हत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी एसीपी विक्रम कदम यांनी सांगितले, घटनेचे गांभीर्य पाहता सर्व तपशील उघड करणं योग्य नाही.आरोपीला अटक केली असून आणखी कुणी सामील आहे का याचाही शोध सुरू आहे. जर दुसरे कोणी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अटक आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशीही केली जात आहे.दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे तळोजा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.