कर्जत तालुक्यात पुन्हा जनावर चोरीचा प्रकार… चिंचवाडीतील आदिवासी शेतकरी पारधी यांचा बैलजोड पळविला…  

0
5

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-

कर्जत तालुक्यातील चिंचवाडी येथे पुन्हा एकदा जनावर चोरीची घटना घडली आहे.दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री,पोशिर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाडा चिंचवाडी येथे शेतकरी गणेश विठ्ठल पारधी यांच्या बैलजोडीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.गावात नवरात्रोत्सवाच्या उत्साहाचे वातावरण असतानाच रात्री १२:४० ते १ वाजेदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,चार चोरट्यांची टोळी मारुती स्विफ्ट सदृश्य वाहनाने आली. त्यांनी बैलांना इंजेक्शनद्वारे भूल देवून गाडीत कोंबले आणि पळ काढला.काही ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला,परंतु चोरटे चपळाईने पसार झाले.वाडीतील एका तरुणाने या घटनेचे काही क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपले असून,तो व्हिडीओ पोलिस तपासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

पारधी कुटुंब आणि अन्य आदिवासी शेतकरी बैलांवर शेतीसाठी पूर्णतः अवलंबून आहेत. अशा प्रकारच्या चोऱ्यांमुळे त्यांचे आर्थिक व भावनिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. या घटनेमुळे संपूर्ण चिंचवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, चिंचवाडी परिसरात गेल्या ७-८ वर्षांत दरवर्षी २०-२५ बैल चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत.प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. पूर्वी ग्रामीण भागात नियमित पोलिस पेट्रोलिंग होत असे, त्यामुळे अशा घटना कमी प्रमाणात होत्या. मात्र, सध्या पेट्रोलिंग बंद असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. घटनेनंतर दौलत पारधी, गणेश पारधी, काळू निरगुडा व इतर ग्रामस्थांनी तत्काळ कळंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे पुन्हा गस्त व नियमित पेट्रोलिंग सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच, दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,चोरांना आता पोलिसांची भीतीच उरलेली नाही.प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर अशा घटना आणखी वाढतील.ही घटना केवळ चिंचवाडीपुरती मर्यादित नसून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांसाठी गंभीर इशारा आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे.