पनवेल शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या खुनाच्या प्रयत्नाच्या (कलम ३०७,३४ भा.दं.वि.) खटल्यात ॲड.सुरेश दिनकर जाधव यांनी आपल्या सखोल कायदेशीर ज्ञान, पुराव्यांचा अचूक वापर आणि प्रभावी युक्तिवाद यांच्या बळावर आरोपीचा यशस्वी बचाव करून त्याची निर्दोष सुटका करून घेतली आहे.
वर्तकनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ५२/२०२० नोंदविण्यात आला होता. फिर्यादी सुमित विष्णू गावित (रा.कोकणीपाडा, ठाणे) यांनी तक्रार दाखल केली होती की, आकाश सुकलाल भोये आणि इतर दोन जणांनी त्याच्यावर चाकू व चॉपरने हल्ला केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा . पोलीस आयुक्त श्री. पंकज शिरसाठ यांनी केला.
सदर प्रकरणात आरोपी तुषार गुरुदास पाटील व यश नंदू पाटील (रा.कळवा- ठाणे) यांना १२ फेब्रुवारी २०२० रोजी अटक करण्यात आली. आरोपी क्रमांक दोन तुषार पाटील यांचा बचाव ॲड. सुरेश दिनकर जाधव यांनी केला, तर इतर आरोपींचे प्रतिनिधित्व ॲड.राजू गायकवाड व ॲड.सोनवणे यांनी केले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश ठाणे यांच्या न्यायालयात दीर्घ सुनावणीनंतर शुक्रवार दि.१०ऑक्टोबर २०२५ रोजी निकाल देण्यात आला. न्यायालयाने ॲड. जाधव यांनी मांडलेला तथ्याधारित, कायद्याच्या तरतुदींवर आधारित बचाव ग्राह्य धरत,आरोपी क्रमांक दोन यांना निर्दोष मुक्त केले. कोर्टकामी ॲड जाधव यांचे सहकारी ॲड गणेश पुजारी यांनी सहकार्य केले
असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावलेले आणि निवृत्तीनंतर वकिली क्षेत्रात प्रवेश केलेले ॲड.सुरेश जाधव यांनी अल्पावधीतच आपल्या प्रगल्भ कायदेशीर अभ्यासाने आणि कौशल्याने न्यायालयीन क्षेत्रात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गुन्हे तपासातील प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याच्या सखोल समजुतीच्या आधारे त्यांनी सादर केलेली बाजू न्यायालयास पटली.यामुळे त्यांच्या व्यावसायिकतेचा उच्चांक दिसून आला.
या यशस्वी निर्णयाबद्दल न्यायालयीन वर्तुळ, सहकारी वकील आणि मित्रपरिवाराकडून ॲड.सुरेश जाधव यांचे हार्दिक अभिनंदन होत असून ते नवोदित वकिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

