रुग्णालयातून पसार झालेला कुख्यात गुंड राजकुमार म्हात्रे पोलिसांच्या जाळ्यात… हत्येचा गुन्हा असलेला पसार राजकुमार म्हात्रे ४८ तासात ताब्यात…

0
7

खारघर शिवसत्ता टाइम्स (दिपक कांबळे):- 

पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला तळोजा पोलीस ठाण्यातील आरोपी राजकुमार म्हात्रे हा उपचारादरम्यान पनवेलमधील खाजगी रुग्णालयातून पसार झाल्यानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी खारघरमधील इनामपुरी गावालगत करण्यात आली.

राजकुमार म्हात्रे हा तळोजा पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून, सप्टेंबर महिन्यात त्याच्याविरोधात तसेच त्याच्याशी संबंधित अनिकेत म्हात्रे या व्यक्तीविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. ५ सप्टेंबर रोजी खुटारी परिसरात झालेल्या हल्ल्यात बारा ते तेरा जणांनी राजकुमार म्हात्रे याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी अनिकेत म्हात्रेसह इतरांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या घटनेच्या काही दिवसांनंतर राजकुमार म्हात्रे यानेही अनिकेत म्हात्रेकडे पिस्तूल रोखत गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पिस्तूलचा ट्रिगर दाबल्यावर गोळी सुटली नाही, त्यामुळे अनिकेत बचावला. या घटनेनंतर १२ सप्टेंबर रोजी राजकुमार म्हात्रेवरही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हल्ल्यात जखमी झालेल्या राजकुमार म्हात्रेवर पनवेल येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तळोजा पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले असताना, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने पलायन केले. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करून गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खारघर येथील इनामपुरी गावालगत सापळा रचला. अखेर १२ ऑक्टोबर रोजी या सापळ्यात पाहिजे आरोपी राजकुमार म्हात्रे पोलिसांच्या तावडीत सापडला.

तळोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून पुढील चौकशी सुरू असून, त्याने रुग्णालयातून कशा पद्धतीने पलायन केले आणि त्याला कोणाची मदत मिळाली का, याचाही तपास सुरू आहे. या अटकेनंतर तळोजा पोलीस ठाण्याच्या टीमने मोठा दिलासा घेतला असून, परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.