कोल्हारेत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंचांचा पलटवार… सर्व आरोप खोटे असून कामे नियमाप्रमाणेच केल्याचा दावा…

0
2

कर्जत शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-   

कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विरले यांनी त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार व अनियमिततेच्या आरोपांचे जोरदार खंडन करत सर्व आरोप “खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे स्पष्ट केले आहे. नेरळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या बाजूने सविस्तर स्पष्टीकरण देत ग्रामपंचायतीतील प्रत्येक काम पारदर्शक व कायदेशीर मार्गाने केल्याचा दावा केला.

विरले म्हणाले,ग्रामपंचायत कार्यालयातील प्रत्येक निर्णय,विकासकामे आणि निधीचा वापर शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात आला आहे. कोणालाही शंका असल्यास आम्ही तपासासाठी पूर्णपणे तयार आहोत.खोटे आरोप करून जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीतील बांधकाम कामांमध्ये अनियमितता आणि निधी दुरुपयोग झाल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय हजारे यांनी केला होता. त्यांनी सरपंच विरले यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत प्रशासकीय तपासाची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना विरले म्हणाले,सर्व कागदपत्रे तपासासाठी खुली आहेत.आम्ही गावाच्या विकासासाठी काम करत आहोत,वैयक्तिक स्वार्थासाठी नाही.

या आरोप-प्रत्यारोपांमुळे कोल्हारे ग्रामपंचायतीतील राजकीय वातावरण तापले आहे. काही ग्रामस्थ आणि विरोधी सदस्यांनी निधीवाटप व बांधकाम प्रक्रियेबाबत प्रशासनाकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात स्थानिक प्रशासनाकडून सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विजय हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, आम्हाला न्याय हवा आहे. जर सर्व काही पारदर्शक असेल, तर निष्पक्ष तपास व्हावा यासाठी आम्ही तयार आहोत.या पार्श्वभूमीवर प्रशासन पुढे काय निर्णय घेते आणि तपासानंतर नेमके सत्य बाहेर येते का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.