उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
गेटवे ऑफ इंडिया,मुंबई ते मांडवा-अलिबाग या जलमार्गावर दररोज हजारो प्रवासी आणि पर्यटक प्रवास करतात.या मार्गाचा प्रमुख दुवा असलेली मांडवा जेट्टी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. पुलाच्या खांबांवरील सिमेंट गळून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या असून,कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, महाराष्ट्र सागरी मंडळ याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी आणि पर्यटकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काही वर्षांपूर्वी शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे आधुनिक आणि आकर्षक जेट्टी बांधण्यात आली होती. उद्घाटनही मोठ्या थाटामाटात झाले होते. पण काहीच वर्षांतच या पुलाची दुर्दशा झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पुलाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा जलवाहतूक सुरु झाल्याने दररोज गेटवेवरून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनकडे जाणाऱ्या प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. जेट्टीवरील शेडची पत्रे गंजल्यामुळे ती काढण्यात आली आहेत, तर नवीन पत्रे बसविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना भिजत उभे राहावे लागते आणि उन्हाळ्यात प्रखर ऊन सहन करावे लागते.याशिवाय पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची कोणतीही सोय नाही. महिला प्रवाशांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. व्हीलचेअर, विश्रांतीची जागा, आणि वाहनांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, मंत्री, आमदार आणि प्रतिष्ठित व्यक्तींना घेण्यासाठी जेट्टीवर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने ये-जा करत असल्याने जेट्टीच्या स्थैर्यावर अधिकच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.मांडवा जेट्टी ही रायगड जिल्ह्याचे पर्यटनद्वार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनावर असेल,” असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,मांडवा जेट्टीचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईकडून करण्यात आले असून, त्यासंबंधी दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. हे काम टेंडर प्रक्रियेतून लवकरच सुरु होईल. तसेच शेडचे काम रेमंड कंपनीकडे असून पावसामुळे ते संथगतीने सुरु आहे. तथापि, प्रत्यक्षात अद्यापही कोणतीही ठोस कारवाई दिसत नसल्याने प्रवासी वर्गामध्ये असंतोष वाढत आहे.आता तरी जागे व्हा, अन्यथा दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनावरच असेल…असा इशारा प्रवाशांकडून देण्यात आला आहे.

