अलिबाग शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
अलिबागच्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी झालेल्या एका दुःखद घटनेत दोन तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस आणि जीवरक्षक पथकांनी ड्रोन व बॅटरी लाइटच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली आहे.
बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे शशांक सिंग (वय १९, रा. उलवे, ता. पनवेल) आणि पलाश पखर (वय १९, रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी आहेत. हे दोघे आणि त्यांचे दोन मित्र उरण–नवी मुंबई परिसरातून अलिबागला फिरण्यासाठी आले होते, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली.
संध्याकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास हे चार मित्र समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी एक तरुण अचानक बुडू लागल्याने दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही लाटांच्या तडाख्यात अडकून बुडाले आणि बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जीवरक्षक पथकांना पाचारण करून तातडीने शोधमोहीम सुरु केली. रात्रीचा अंधार आणि समुद्राची भरती यामुळे शोधकार्य अधिक कठीण झाले असले तरी, ड्रोन आणि बॅटरी लाइटच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत.या दुर्घटनेमुळे संपूर्ण अलिबाग परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पर्यटकांना समुद्रात पोहताना खबरदारी घेण्याचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

