कर्जतच्या राजकारणात मोठा भूकंप…शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र… अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

राज्यात महायुतीचं सरकार असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडला आहे. कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीतून वेगळं होत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी हातमिळवणी केली आहे. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवणार असल्याची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांच्या बैठकीत करण्यात आली आहे.

शनिवारी कर्जत येथील रेडिसन ब्लू रिसॉर्ट येथे झालेल्या संयुक्त बैठकीत दोन्ही पक्षांचे जिल्हा आणि तालुका पातळीवरील प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, प्रवक्ता भरत भगत, उपाध्यक्ष एकनाथ धुळे, प्रदेश नेते भगवान भोईर तसेच युवक आणि महिला आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तर शिवसेना (ठाकरे गट) तर्फे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, प्रभारी तालुका प्रमुख बाजीराव दळवी, तालुका संघटक बाबू घारे, संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर यांच्यासह युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत, खोपोली, माथेरान या तीन नगरपरिषदांबरोबरच खालापूर नगर पंचायत, रायगड जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि पंचायत समितीच्या बारा जागांवर संयुक्त उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्या महायुतीचा घटक असला तरी कर्जत मतदारसंघात मात्र महायुतीत फूट पडली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही पक्षांमध्ये गुप्त बैठकींची मालिका सुरू होती. अखेर या चर्चेला युतीचं रूप देत “स्थानिक पातळीवर महायुती संपली असा स्पष्ट संदेश दोन्ही पक्षांनी दिला आहे.

या नव्या राजकीय समीकरणामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. विशेषतः कर्जत, खोपोली, माथेरान आणि खालापूर या भागातील आगामी निवडणुका आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा करताना “जनतेच्या प्रश्नांवर आणि स्थानिक विकासाच्या मुद्यांवर आम्ही एकत्र आलो आहोत. पक्षीय स्वार्थ नव्हे, तर जनतेचा विकास आमचं प्राधान्य असेल, असं स्पष्ट केलं आहे.