पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणजेच पनवेल…पनवेल रेल्वेस्टेशनवरील सार्वजनिक शौचालयांची स्थिती पाहून ‘स्वच्छ भारत अभियानाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकावर प्रवाशांना,विशेषतः महिलांना,तुटलेले दरवाजे,पाण्याची अपुरी व्यवस्था आणि सर्वत्र पसरलेल्या तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.ही दयनीय अवस्था पाहता,रेल्वे प्रशासन आधुनिकीकरणाचे पोकळ दावे करत आहे की, खरोखर काही काम करत आहे?असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.प्रवाशांनी, विशेषतःमहिलांनी आमच्याशी बोलताना गंभीर आरोप केले आहे की,आम्ही शौचालय वापरण्यासाठी प्रवेशद्वारावर बसलेल्या कर्मचाऱ्याला ५ रुपये शुल्क देतो, तरीही आतमध्ये स्वच्छता नाही, पाणी नाही आणि तुटलेले दरवाजे आहेत. हे पैसे नेमके जातात कुठे? स्वच्छतेसाठी पैसे देऊनही जर आम्हाला नरकात असल्यासारखा अनुभव येत असेल, तर रेल्वे प्रशासनाची ही फक्त लूट आहे.
या अस्वच्छतेमुळे महिलांना गंभीर आरोग्य समस्यांचा धोका निर्माण झाला आहे. महिला प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ तातडीने थांबवण्याची गरज आहे.कॅमेऱ्यासमोर न येता काही संतप्त नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना थेट प्रशासक नेमके करत तरी काय आहेत? नागरिकांचे प्राथमिक आरोग्य आणि सोयीसुविधांकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष आहे… लाखो प्रवाशांना या स्टेशनवर यातना सहन कराव्या लागत आहेत,तेव्हा कुठे आहेत सगळे ?फक्त एसी ऑफिसमध्ये बसून काही काम आहे की नाही? जनतेच्या आरोग्याशी होणारा हा खेळ रेल्वे प्रशासन कधी थांबवणार? यावर कठोर कारवाई कधी होणार?याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…

